किशोरी शक्ती योजना हया केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीबाबबत
दि १४ सप्टेंबर २००६ च्या शासन निर्णयानुसार....
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण / आदिवासी आणि नागरी क्षेत्रातील सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या ४१६ प्रकल्पात Girl to Girl Approach पध्दतीने किशोरी शक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२.किशोरी शक्ती योजनेची उद्दिष्टे:-
२.१) ११ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
२.२ ) किशोरवयीन मुलींना घरगुती व व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे व अर्थार्जनासाठी सक्षम बनविणे.
२.३) किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, व व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता इ० विषयीचे शिक्षण देऊन त्यांना जागृत करणे व बाल विवाहास प्रतिबंध
करणे.
२.४) किशोरवयीन मुलींना निर्णयक्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून अनौपचारिक शिक्षण देणे.
३)लाभार्थी निकष व निवड :-
३.१) एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण / आदिवासी आणि नागरी क्षेत्रातील सोबत जोडलेल्या
३.२)परिशिष्ट - अ नुसार ४१६ प्रकल्पात किशोरी शक्ती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना Girl to Girl Approach या पध्दतीने राबविण्यात यावी.
या योजनेंतर्गत प्रत्येक परिक्षेत्रातून ११ ते १८ वर्षे वयोगटातील २० किशोरवयीन मुलींची ६ महिन्याकरीता निवड करण्यात यावी. त्यापैकी १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३ किशोरवयीन मुलींना अंगणवाडी केंद्राशी संलग्न ठेवण्यात यावे व त्यांना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात यावे. सदर तीन किशोरवयीन मुलींची निवड करताना दारिद्रय रेषेखालील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच शाळा सोडलेल्या किशोरवयीन मुली यांना प्राधान्य देण्यात यावे.
३. ३) ग्रामीण, आदिवासी आणि नागरी प्रकल्पात सदर मुलींची निवड पर्यवेक्षिकेने बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवसांच्या आत करण्यात यावी.
४)किशोरी शक्ती योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे राहतील. ४. १) अंगणवाडी सेविका व परिचारिका यांच्या देखरेखीखाली किशोरी शक्ती योजनेंतर्गत प्रकल्पातील सरासरी ११ ते १८ वर्षे वयोगटातील निवड केलेल्या सर्व २० किशोरवयीन मुलींना लोहयुक्त गोळया (IFA Tablets) आठवडयातून एकदा व जंतनाशक गोळया (Deworming Tablets) सहा महिन्यातून एकदा देण्यात येतील.
४. २) किशोरवयीन मुलींचे दरमहा नियमितपणे वजन घेण्यात यावे तसेच त्या मुलींचे रक्त तपासणी(हिमोग्लोबिनच्या प्रमाणासाठी ) करण्यात यावी व त्याची दरमहा अंगणवाडीत नोंद ठेवण्यात यावी.
४. ३) या योजनेंतर्गत Girl to Girl Approach या पध्दतीनुसार मुख्यसेविका व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी निवड केलेल्या किशोरवयीन मुलींपैकी दारिद्रय रेषेखालील १५ ते १८ वर्षे वयोगटातील
३ मुलींचे बीट स्तरावर एकत्रित प्रशिक्षण/ शिबीर घेण्यात यावे. या मुलींचे प्रशिक्षण घेऊन झाल्यानंतर त्यांचेमार्फत अंगणवाडी स्तरावर परिक्षेत्रातील इतर किशोरवयीन मुलांना प्रशिक्षीत करण्यात यावे. ४.४) मुख्य सेविका यांनी गृह विज्ञान महाविद्यालय / गृहविज्ञान, आरोग्य विभाग, वैद्यकिय महाविद्यालयातील विषयतज्ञ / वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधून त्यांचे मार्फत भाषणे, प्रात्यक्षिक, प्रदर्शन शिबिरे अथवा प्रशिक्षण आयोजित करावेत. या योजनेंतर्गत आरोग्य पोषण शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सामुदायिक पोषण, मासिक पाळी त्यांचे विज्ञान, स्वच्छता, गैरसमज, गर्भावस्था मागील शरीर शास्त्र, गर्भनिरोधन, बालविवाहाचे परिणाम, लैंगिक छळ अशा परिस्थितीत कोणाची मदत घ्यावी, हेल्पलाईनचा उपयोग, एडस नियंत्रण व प्रतिबंध स्त्रीविषयक कायदे व हक्क, विवाह कायदे. इ० विषयांबाबत प्रबोधन करण्यात यावे. तसेच याकरिता अंगणवाडयामध्ये वाटप करण्यात आलेली पुस्तके, भिती पत्रके यांचा वापर करण्यात यावा.
४.५)किशोरवयीन मुलींना स्वयंपूर्ण करण्याकरीता त्यांना कौशल्य प्राप्त व्हावे याकरीता खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. उदा. मेहंदी काढणे, कच-यातून कला, जैविक शेती, गांडूळ खत, अकाऊंट किपींग, घरगुती विजेच्या उपकरणांची दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बदलत्या काळानुसार आवश्यक ते तांत्रिक ज्ञान मुलींना गरजेनुसार देण्यात यावे.
४.६) किशोरी शक्ती योजनेंतर्गत लाभार्थी किशोरवयीन मुलींपैकी मध्येच शाळा सोडलेल्या किशोरवयीन मुलींना अंगणवाडी केंद्रात कार्यरत शिक्षण (Functional Literacy) देऊन त्यांना पुन्हा शालेय शिक्षणासाठीउद्युक्त करण्यास्तव अंगणवाडी स्तरावर शालेय उपक्रम राबविण्यात यावेत.
४.७) किशोरी शक्ती योजनेंतर्गत Girl to Girl Approach या पध्दतीनुसार अंगणवाडी केंद्राशी संलग्न ठेवण्यात आलेल्या फक्त ३ किशोरवयीन मुलींना पूरक पोषण आहार देण्यात यावा. तथापि किशोरी शक्ती योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पूरक पोषण आहार देण्यासंदर्भात आर्थिक तरतूद करुन त्यानुसार स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. त्यानंतरच लाभार्थ्यांना आहार देण्याची कार्यवाही करण्यात यावी. तथापि किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण व इतर सेवा देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही सुरु करण्यात यावी..
५. योजनेचे संनियंत्रण (Monitoring) -
५.१) किशोरी शक्ती योजना या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण व आदिवासी प्रकल्पासाठी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) जिल्हा परिषद हे जबाबदार अधिकारी राहतील.
५. २) नागरी प्रकल्पात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित उपायुक्त, एकात्मिक बाल विकास
सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई हे जबाबदार अधिकारी राहतील.
५.३) या योजनेचे प्रत्यक्ष संनियंत्रण व अंमलबजावणी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल.
५. ४) या योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींना योजनेचा लाभ दिल्यासंदर्भाची कागदपत्रे अंगणवाडीत ठेवण्यात यावीत आणि त्याप्रमाणे अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
५. ५ ) ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) यांचेमार्फत केंद्रशासनाने विहीत केलेल्या विहीत प्रपत्रात किशोरवयीन मुलींसंदर्भात माहिती आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचेकडे पाठवावी. नागरी प्रकल्पामध्ये संबंधित बाल विकास प्रकल्प अधिका-यांनी संबंधित उपायुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई यांचेमार्फत पाठवावी.
५.६) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी सर्व प्रकल्पाची एकत्रित स्वरुपातील माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या मासिक प्रगती अहवालात राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे पाठवावी.
६.आर्थिक तरतूद -
किशोरी शक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंदशासनामार्फत प्रति वर्षी प्रति प्रकल्प रु.१.१० लाख इतका निधी राज्य शासनास उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यानुसार राज्यातील ४१६ प्रकल्पांमध्ये सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता सन २००६-२००७ या चालू वित्तीय वर्षात रु.४,५७,६०,००० /- ( रु. चार कोटी सत्तावन्न लाख साठ हजार फक्त) एवढा खर्च करण्यास शासन मान्यता देत असून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई यांना नियंत्रक तथा आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पासाठी होणारा खर्च मागणी क्र. एक्स-१ मुख्यलेखाशिर्ष २२३६-पोषण आहार,-०२ पोषक अन्न व पेये यांचे वितरण, १०१, विशेष पोषण आहार कार्यक्रम, केंद्र पुरस्कृत योजना, ग्रामीण व आदिवासी (०४) (०१), महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १२३ व २६१ अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने [ २२३६००७२] [स्थानिक क्षेत्र ] ४१ सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखालील मंजूर तरतूदीतून तसेच नागरी प्रकल्पासाठी होणारा खर्च उपरोक्त मुख्य लेखाशिर्षाखालील केंद्रपुरस्कृत योजना (०१)(०३) एकात्मिक बालविकास सेवा योजना (२२३६०५१९), ४१ सहाय्यक अनुदाने या उपलेखाशीर्षाखालील मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा व तो त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .