राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका / खाजगी अनुदानित / विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत....
शासन परिपत्रक दि 1/10/2025 नुसार.....
राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना आवाहन करण्यात येत आहे.
२.
राज्यातील सर्व शाळांमध्ये ( इयत्ता १ ली ते १२ वी ) शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा “माजी विद्यार्थी संघ" स्थापन करण्यात यावा. यासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे व कार्यसूची
निश्चित करण्यात यावी.
२.१) संघ स्थापनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे :-अ) संघाचे नाव : "माजी विद्यार्थी संघ” (यापुढे संबंधित शाळेचे नाव नमूद करावे). उदा. “माजी विद्यार्थी संघ" " संबंधित शाळेचे / उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव " ब) माजी विद्यार्थी संघ समितीची रचना :-
अध्यक्ष : सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी (पुरुष / स्त्री). उपाध्यक्ष : सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी (पुरुष / स्त्री). सचिव : संबंधित शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य.
कोषाध्यक्ष : सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी (पुरुष / स्त्री).
सदस्य : स्थानिक व नोकरी / उद्योग / व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक असणारे माजी
विद्यार्थी.
सल्लागार सदस्य : शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक / अध्यापक / मुख्याध्यापक / प्राचार्य
प्रतिनिधी, एक पालक प्रतिनिधी, एक सेवानिवृत्त अधिकारी व एक सेवानिवृत्त शिक्षक.
क) सभासदत्व : संबंधित शाळेत शिक्षण घेतलेला कोणताही माजी विद्यार्थी नोंदणी (ऑनलाईन / ऑफलाईन) करून संघाचे सभासदत्व घेऊ शकेल.
ड) नोंदणी : प्रत्येक शाळेत शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन प्रणालीवर माजी विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करण्यात यावी तसेच शाळेच्या स्तरावर सदस्यांची यादी ठेवण्यात यावी.
इ) बैठका : माजी विद्यार्थी संघाचा मेळावा, स्नेहसंमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करण्यात
यावे.
माजी विद्यार्थी संघ समितीच्या वर्षातून किमान २ बैठका घेण्यात याव्यात. आवश्यकता असेल तेव्हा या समितीची बैठक सदस्यांच्या सोयीनुसार सर्वसंमतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे किंवा ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावी.
३) माजी विद्यार्थी संघाकडून अपेक्षित कार्ये :
३. १) भौतिक सुविधा व पूरक सुविधा उभारणी :-
शाळेच्या गुणवत्ता वाढीबरोबरच स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, शाळेची रंगरंगोटी, दुरुस्ती, सौंदर्यीकरण, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक व शाळेसाठी आवश्यक इतर विविध सुविधा उपलब्ध करून देणेसाठी मार्गदर्शन व सहकार्य. तसेच पर्यावरणपूरक उपक्रम ( वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, परसबाग निर्मिती, पाणी संवर्धन इ.) राबविण्याकरिता शाळेस मार्गदर्शन करणे.
३. २) शैक्षणिक व गुणवत्तावर्धन कार्य :-
विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य, प्रयोग सामग्री उपलब्ध करून देणे. शालेय विद्यार्थ्यांकरिता माजी शिक्षक, तज्ज्ञ, विद्यार्थ्यांची व्याख्याने / कार्यशाळा यांचे आयोजन करणे. विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, उच्च शिक्षणाच्या संधी, परदेशातील शैक्षणिक पर्याय याबद्दलची माहिती देणे.
३.३) विद्यार्थी गुणवत्ता विकास :-
विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीत वाढ, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संगीत, शारीरिक शिक्षण व विज्ञान उपक्रमात सहकार्य, रोजगार कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, डिजिटल साक्षरता
कार्यक्रम यासंदर्भात सहयोग देणे.
३. ४) सामाजिक व भावनिक बांधिलकी :-
शाळेत शिकलेल्या आठवणी जपणे, शाळेशी नाते घट्ट ठेवणे, गावाशी / मातीशी संबंध दृढ करणे. शाळेबद्दल ऋण व्यक्त करणे, शाळेचा वर्धापन दिन साजरा करणे. माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करून शाळेतील तत्कालीन व सध्याच्या शिक्षकांचा सन्मान करणे. आपल्या शाळेचे महत्त्व पालकांना व ग्रामस्थांना समजावून सांगणे.
३.५) आर्थिक पारदर्शकता :-
माजी विद्यार्थी यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत जाहीर केल्यास शाळेने माजी विद्यार्थ्यांकडून शक्यतो थेट रोख रक्कम स्वीकारू नये. त्याऐवजी शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा माजी विद्यार्थी संघामार्फत उपलब्ध करून घ्याव्यात. माजी विद्यार्थी संघाने केलेल्या खर्चाचा व इतर बाबींचा वार्षिक अहवाल शाळेच्या नोटीस बोर्डवर लावावा. तसेच त्याचे आर्थिक विवरण अहवाल शाळेत जपून ठेवावेत.
३.६) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व पुरस्कार :-
शैक्षणिक प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी शिष्यवृत्ती निधी निर्माण करणे.
गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शिष्यवृत्ती देऊ करणे.
४) माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबतची शासनाची भूमिका :-
अ) शाळांचा/ विद्यालयांचा दर्जा उंचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे.
ब) माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या / विद्यालयांच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे.
क) शिक्षणाचा दर्जा ग्रामीण व शहरी भागात समान रीतीने उंचावण्यास मदत करणे.
ख) माजी विद्यार्थ्यांचे शाळा/ विद्यालयासोबत असणारे ऋणानुबंध घट्ट करणे.
ग) माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशापासून शाळेमध्ये / विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे.
घ) माजी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी, मातीशी संबंध दृढ करणे.
च) शासन या उपक्रमासाठी धोरणात्मक पाठबळ व समन्वय उपलब्ध करून देईल. शाळांनी नियोजित मेळावे / स्नेहसंमेलन आयोजनासाठी आवश्यक खर्चाची प्रतिपूर्ती वेतनेतर अनुदान / इतर निधीतून करावी.
छ) विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक, प्राचार्य डाएट, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत सर्व शाळा / विद्यालयांमध्ये या संघाच्या स्थापनेची कार्यवाही वेळेत पूर्ण केली जाईल.
ज) या उपक्रमातून राज्यभरात चांगले काम करणाऱ्या माजी विद्यार्थी संघाच्या यशोगाथा संपूर्ण राज्यात प्रसारित केल्या जातील, त्यामुळे इतर शाळांना देखील प्रेरणा मिळेल व या संघांचा देखील सन्मान होईल. झ) माजी विद्यार्थी संघातील सर्व सदस्यांची नोंदणी करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ऑनलाईन प्रणालीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
५) वार्षिक मेळावा :-
प्रत्येक वर्षी सण-समारंभ जसे की, गणेशोत्सव / दिवाळी / नवरात्री / दसरा / ईद / ख्रिसमस / गावच्या यात्रेदरम्यान, इतर सण, उत्सव अथवा महत्वाच्या प्रसंगी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावे आयोजित करण्यात यावेत. या दिवशी शाळा भेट, विद्यार्थ्यांशी संवाद, वार्षिक विकास आराखडा ठरविणे, नवीन करावयाच्या / पूर्ण झालेल्या कामांना मंजूरी, यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सन्मान, शाळेमधील आजी व माजी शिक्षकांचा सन्मान, स्नेहसंमेलन आयोजन आदि कार्यक्रम होतील.
६) शाळेची भूमिका :-
अ) प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा संघ त्वरित स्थापन करावा.
ब) प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थी संघातील सदस्यांची नोंदणी शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन प्रणालीवर
करावी.
क) शाळांनी त्यांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आणि परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, स्नेहसंमेलन आपल्या शाळेत आयोजित करावयाचे आहे. यासंदर्भात शाळांनी किमान १५ दिवस अगोदर आपल्या माजी विद्यार्थी संघातील सदस्यांना मेळावा, स्नेहसंमेलन आयोजनाबाबत पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून माजी विद्यार्थ्यांना मेळावा, स्नेहसंमेलनात सहभागासाठी पुरेसा वेळ मिळेल.
ख) प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी आवश्यक सुविधा (स्टेज, माईक, स्पीकर, खुर्च्या आदि) उपलब्ध करून द्याव्यात.
ग) प्रत्येक शाळेने आयोजित केलेल्या मेळावा, स्नेहसंमेलनाची छायाचित्रे व चित्रफिती शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड कराव्यात.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .